म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन (नॉमिनेशन) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नामनिर्देशन पत्र (नॉमिनेशन) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा आपल्याला कोणाला तरी नामनिर्देशित करण्याचा पर्याय दिला जातो. नामनिर्देशन अशासाठी करावे, जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला, पालकांना किंवा मुलांना गुंतविलेले पैसे विनासायास मिळू शकतील.

नामनिर्देशन ही अशी सुविधा आहे ज्यामध्ये एखाद्या युनिटधारकाचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी त्याने धारण केलेल्या युनिट्सचा किंवा त्याच्या रिडम्पशनद्वारे मिळविलेल्या पैशावर नामनिर्देशित व्यक्ती दावा करू शकते. एकापेक्षा अधिक व्यक्तींनी युनिट्स धारण केले असल्यास, सर्व युनिटधारकांना संयुक्तरीत्या एखाद्या व्यक्तीचे नामांकन करावे लागते, सर्व संलग्न युनिटधारकांचा मृत्यू झाल्यानंतर अशा प्रसंगी नामांकित व्यक्तीला सर्व हक्क प्राप्त होतात. ‘सेबी म्युच्युअल फंड्स कायदा, १९९६’मधील कलम २९ए नुसार, म्युच्युअल फंडांना प्रत्येक युनिटधारकांना पुढील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे नामनिर्देशन करण्याचा पर्याय द्यावा लागतो.

म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन म्हणजे काय?
नामनिर्देशन म्हणजे अशी प्रक्रिया असते ज्यात तुमचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी तुमच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करण्याची सुविधा आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड योजनेसाठी नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक करू शकता. नामनिर्देशित व्यक्ती कोणीही व्यक्ती असू शकते – कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या विश्वासातील इतर कोणीही व्यक्ती. तुम्हाला नामनिर्देशित व्यक्तीची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. कारण तुमचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी तुमच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी ती व्यक्ती विश्वासार्ह आणि पात्र असावी लागते.

नामनिर्देशित व्यक्ती कोण असू शकते?
कंपनी/कॉर्पोरेट मंडळ, भागीदारी व्यवसाय, हिंदू अविभक्त परिवार (एचयूएफ), सोसायटी किंवा ट्रस्ट (धार्मिक किंवा धर्मादाय ट्रस्ट व्यतिरिक्त), या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीसह कोणाचीही नामनिर्देशित व्यक्ती म्हणून नेमणूक करू शकते.

नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास, नामांकन करणाऱ्या ग्राहकाने अल्पवयीन नामनिर्देशित व्यक्तीच्या पालकाचे नाव, पत्ता द्यावा. अगदी अनिवासी भारतीय (एनआरआय) देखील, त्या वेळी लागू असलेल्या एक्स्चेंज कंट्रोल नियमांच्या अधीन राहून नामनिर्देशित व्यक्ती होऊ शकते.

कोण नामनिर्देशन करू शकत नाही?
सोसायटी, ट्रस्ट, कॉर्पोरेट बॉडी, भागीदारी व्यवसाय, हिंदू अविभक्त परिवारातील कर्ता, मुख्यत्यार पत्रधारक यासह व्यक्ती नसलेल्या संस्था नामनिर्देशित होऊ शकत नाही. नामनिर्देशित व्यक्ती ट्रस्ट (धार्मिक किंवा धर्मादाय ट्रस्ट व्यतिरिक्त), सोसायटी, कॉर्पोरेट बॉडी, भागीदारी व्यवसाय, हिंदू अविभक्त परिवारातील कर्ता, मुख्यत्यार पत्रधारक असता कामा नये. मुख्यत्यारपत्र धारक (पीओए) नामनिर्देश प्रपत्रावर स्वाक्षरी करू शकत नाही.

गुंतवणूकदार अनेक नामांकने करू शकतो का?
होय, गुंतवणूकदाराला एका फोलिओत तीनपर्यंत नामांकने नोंदविण्याचा आणि प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला किती टक्के रक्कम मिळेल हे नमूद करण्याचा अधिकार आहे; परंतु जर टक्केवारी नमूद केली नाही तर प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला समान भाग मिळेल. अनेक नामांकने करण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदाराला स्वतंत्र मल्टिपल नामनिर्देश प्रपत्र भरावे लागेल आणि ते एएमसीकडे सादर करावे लागेल.

नामांकन कसे करावे?
युनिट्सच्या खरेदीच्या वेळी अर्ज करताना किंवा नंतरही नामांकन करता येते. म्युच्युअल फंडात प्रथम गुंतवणूक करताना नामांकन करण्यासाठी, अर्जदाराने खाते उघडण्याच्या अर्जातील ‘नामांकन’ भाग भरावा आणि नंतर नामांकनाची नोंद करण्यासाठी, गुंतवणूकदाराला विहित नमुन्यातील नामांकन प्रपत्र भरावे लागेल आणि पूर्ण भरलेले नामांकन प्रपत्र म्युच्युअल फंडाच्या नियोजित गुंतवणूकदार सेवा केन्द्रावर किंवा त्यांच्या रजिस्ट्रार्सकडे सादर करावे लागेल. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवरूनदेखील ऑनलाइन नामांकन करू शकतो.

नामांकनाची नोंदणी करण्याचे काय फायदे असतात?
नामांकनाची नोंदणी केल्यास, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी नामनिर्देशित व्यक्तीला (व्यक्तींना) पैसे अगदी सहज ट्रान्स्फर करणे सुलभ होते; परंतु नामांकन न केल्यास, अशा प्रसंगी, दावा करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या नावे युनिट्स ट्रान्स्फर करून घेण्यासाठी मृत्युपत्र, कायदेशीर वारस प्रमाणपत्र, इतर कायदेशीर वारसांचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र वगैरेसारखे अनेक दस्तऐवज सादर करावे लागतात.

एकदा नेमणूक केल्यानंतर मी माझ्या नामनिर्देशित व्यक्तीत बदल करू शकतो का?
एकदा नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक केल्यानंतर कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा नामांकनात बदल करता येतो.

– भालचंद्र जोशी
(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला बाजारपेठेची जोखीमा लागू आहेत, योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचून घ्यावेत.