९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी आयुर्विम्याचे पैसे मिळणार

आयुर्विमा धारकांसाठी खूशखबर आहे. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी विमा कंपनी निश्चित रक्कम (Sum Assured) देण्यास नकार देऊ शकत नाही. राष्ट्रीय ग्राहक पुनर्वसन आयोगाने (एनसीडीआरसी) एका प्रकरणात विमा कंपनीला मृत पॉलिसीधारकाच्या परिवारला ९ टक्के व्याजाबरोबर २.५ लाख रूपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणात पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० व्या दिवशीच झाला होता.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण पंजाबमधील फाजिल्का येथील कुलविंदर सिंग यांचे आहे. त्यांनी २६ मार्च २०१० मध्ये एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शूरन्स कंपनीची एक विमा पॉलिसी खरेदी केली होती. यासाठी त्यांनी ४५,९९९ रूपयांचा प्रिमियम भरला होता.

त्याचवर्षी २५ ऑगस्ट रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता. पण कंपनीने त्यांना प्रिमियमची रक्कम देऊन त्यांची बोळवण केली होती. न्या. एस श्रीशा यांनी २७ जून २०१२ रोजी विमा नियामक आयआरडीएचा हवाला देत विमा कंपनीला संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. आयआरडीएचा हा आदेश पण याच विमा कंपनीसाठी होता.

एनसीडीआरसीने म्हटले की, विमा कंपन्या ९० दिवसांचा प्रतिक्षा कालावधी ठेवू शकत नाही. हे कारण देऊन ते विम्याचा दावा फेटाळू शकत नाहीत. आयआरडीएने ९० दिवसांचा प्रतिक्षा कालावधी सांगत २१ क्लेम फेटाळले होते. यासाठी याच कंपनीला एक कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.