एका लग्नाची अर्थ अनुरूपता

सुधीर आणि नेहा जोशी दोघेही वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करतात. त्यांना निधी ही एकुलती एक मुलगी आहे. चार वर्षांपूर्वी मुंबईतील एका प्रख्यात महाविद्यालयातून उपयोजित कला शाखेची पदवी घेतल्यानंतर निधी सध्या माहिती तंत्रज्ञान उद्योगातील एका कंपनीत काम करीत आहे. निधीला नोकरीला लागून तीन वर्षे झाली असल्याने सुधीर आणि नेहा यांना निधीने लग्न करावे असे वाटते. निधी आधुनिक विचारांची असल्याने तिचा जात-पात, कुंडली-नाडी गुणमीलनापेक्षा फेसबुकवर अधिक विश्वास आहे. चार्ल्स डार्विनच्या A man’s friendships are one of the best measures of his worth या वचनावर निधीची आस्था असणे स्वाभाविकच.

सुधीर आणि नेहा यांना हे न रुचणारे असणेदेखील तितकेच स्वाभाविक. त्याचप्रमाणे निधीचे फेसबुक पोस्टमधील विचारही त्यांना अजिबात पसंत न पडणारे. सुधीर आणि नेहा डिजिटलबरोबरीने फिजिकललासुद्धा तितकेच महत्त्व देणारे. दोहोंनी म्हणजे निधीच्या आईवडिलांनी बँकेत ३० वर्षांहून अधिक काळ काम केल्याने वेगवेगळ्या स्तरावर होणारी आर्थिक फसवणूक त्यांनी जवळून पाहिली आहे. यामुळे निधीसाठी योग्य वर शोधताना त्या मुलाची (आईवडिलांच्या व्यतिरिक्त) नेमकी काय आर्थिक पत आहे हे जाणून घेणे त्यांना गरजेचे वाटते.

सर्वसाधारण विचार केल्यास निधी ही आजच्या लग्नइच्छुक पिढीचे प्रतिनिधित्व करते. शिक्षण आणि त्यानंतर नोकरीत स्थिरावल्यावर आईवडील आपल्या मुलामुलीला भावी वधू किंवा वराबाबत अपेक्षा विचारतात. अशा वेळी मुलीच्या किंवा मुलाच्या मनात नेमके कोणी तरी मुलगा किंवा मुलगी असतेच असे नाही, आणि असलाच तर त्याची बेधडक आपल्या आईवडिलांना कल्पना दिली जाण्याचा आजचा प्रघात आहे. मुलगा किंवा मुलगी भावनिकदृष्टय़ा लग्नाला सामोरे जाण्यास तयार आहेत का हे पाहताना आर्थिकदृष्टय़ासुद्धा सक्षम आहेत का हे पाहणे गरजेचे आहे. जन्म कुंडलीच्या जोडीला आपल्या भावी जावयाची किंवा सुनेची आर्थिक कुंडली मांडणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस सरासरी लग्नाचे वय वाढत आहे. जुळवून आणलेल्या विवाहात कुटुंबांकडून नवदाम्पत्यास काही मदत लागल्यास ती करण्याची तयारी असते. यासाठी सामाजिक पाश्र्वभूमी, आर्थिक तोलामोलाचे स्थळ पाहून लग्न ठरविले जाते. परंतु विवाहपश्चात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे अनेक वर्षे असलेल्या पैसे खर्च करण्याच्या सवयी लग्नानंतर बदलणे सहजासहजी शक्य नसते. भिन्न आर्थिक पाश्र्वभूमी असल्याने दोघांपैकी एखाद्या व्यक्तीस एखाद्या गोष्टीवर केलेला खर्च गरज वाटेल, तर दुसऱ्या व्यक्तीस हाच खर्च अनावश्यक वाटतो. अशा परिस्थितीत अधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीस ‘उधळ्या’ किंवा ‘उधळी’ असे विशेषण लावले जाते. यासाठी नेमके उत्पन्न किती आणि खर्च कोणत्या गोष्टींवर होतो हे जाणणे आवश्यक आहे. जन्मपत्रिकेसोबत तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्‍स मागण्यात काहीही गैर नाही. वाहन कर्ज किंवा गृह कर्ज घेताना बँकसुद्धा रिटर्न्‍स मागत असतात.

एक स्थळ म्हणून चाचपणी करताना इन्कम टॅक्स रिटर्न्‍सवरून करदात्याची बरीचशी माहिती उपलब्ध होऊ शकते. प्रत्येक उद्योग क्षेत्रानुसार वेतनाचे निकष वेगवेगळे असतात. अनेकदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरदार मंडळी उत्पन सांगताना स्थिर आणि झुलत्या वेतनाचा खुलासा न करता एकत्रित वेतन सांगत असतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेतनाचा मोठा हिस्सा प्रोत्साहन-भत्त्यांच्या (पर्क्‍स) स्वरूपात असतो. कर परतावे पाहिल्यानंतर नेमक्या वेतनमानाची कल्पना येऊ शकते.
नोकरी-पेशातील व्यक्तीच्या बाबतीत आयकर वाचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीचा तपशील, गृहकर्ज असल्यास कर्जाचा हप्ता, विम्याचे हप्ते हेही यावरून समजू शकते.

एखादी जाणकार व्यक्ती विम्याच्या हप्त्यावरून विमा कवचाच्या रकमेचा अंदाज बांधू शकते. लग्न ठरविताना मुदतीचा विमा नसल्यास मुदतीचा विमा काढण्याचा आग्रह धरायलाच हवा. अनेकदा लग्न झाल्यानंतर सदनिका खरेदी करण्याचा विचार विवाहेच्छुक करतात. ते योग्यच असते. तरुण वय, एकत्रित उत्पन्नामुळे मोठे गृहकर्ज मिळण्याची शक्यता असते. लग्नानंतर घेतलेले गृहकर्ज फेडण्याची जबाबदारी दोघे संयुक्तरीत्या निभावणार असतात. दुर्दैवाने दोघांपैकी एखाद्याच्या बाबतीत अप्रिय घटना घडल्यास कर्ज फेडण्याची जबाबदारी मागे राहिलेला जोडीदार निभावू शकेल काय आणि या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबाच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील काय, या प्रश्नाची उत्तरे दोघांनी द्यावीत. जर कर्ज फेडण्याची जबाबदारी मागे राहिलेला जोडीदार निभावू शकत नसेल किंवा जोडीदाराच्या आकस्मिक जाण्यामुळे घटलेल्या उत्पन्नामुळे आयुष्यात तडजोड करावी लागू नये यासाठी मुदतीचा विमा, अत्यावश्यक बाब बनली आहे.

विवाह ठरविताना ‘सिबिल स्कोअर’ ही त्या व्यक्तीची महत्त्वाची ओळख आहे. एक प्रकारे व्यक्तीची ही आर्थिक पतच असते. क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, ही कंपनी वैयक्तिक कर्जदाराच्या पतविषयक पूर्वेतिहासाच्या तपशिलावरून त्या त्या व्यक्तीचा ‘सिबिल स्कोअर’ अर्थात ‘पत गुणांक’ निश्चित करीत असते. चांगला ‘पत गुणांक’ असणे हे वैयक्तिक चारित्र्याइतकेच आर्थिक चारित्र्य असल्याचा दाखला आहे.

उत्पन्न, खर्च व दायित्व यांचा मेळ जुळवून, दोहोंना महिन्याकाठी किती शिल्लक राखता येईल. या शिलकीचे काय करायचे यासाठी चांगल्या वित्तीय नियोजकाचा सल्ला घेतला जाईल आणि कुटुंबाचे दीर्घकालीन आर्थिक नियोजन आखले जाण्याबाबत सुधीर व नेहा यांचा आग्रह आहे. नियमित बचत आणि गुंतवणुकीतून साधले जाणारे आर्थिक स्थैर्यातूनही मुलीच्या सुखी संसाराचा पाया रचला जाईल, याची त्यांना पुरेपूर खातरजमा करावयाची होती.

कुटुंबाचा वित्तीय नियोजक या नात्याने सुधीर आणि नेहा यांनी हे सर्व निधीला समजावून दिले. माझ्या मुलीचा किंवा मुलाचा संसार एखाद्या व्यक्तीबरोबर सुखाचा व्हावा यासाठी जितकी पत्रिका पाहणे आवश्यक आहे तितकेच त्या व्यक्तीचे आर्थिक गुणमीलनसुद्धा पाहणे गरजेचे असल्याचे निधीलाही पटले.

लग्न-बंध जुळावेत असे..

  • जन्मपत्रिकेसोबत तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्‍स मागण्यात काहीही गैर नाही.
  • गृहकर्ज असल्यास कर्जाच्या हप्त्याचे प्रमाण किती?
  • लग्न ठरविताना मुदतीचा विमा नसल्यास मुदतीचा विमा काढण्याचा आग्रह धरायलाच हवा.
  • विवाह ठरविताना व्यक्तीचा ‘सिबिल स्कोअर’ अर्थात पत जाणून घेणेही महत्त्वाचेच.
  • वित्तीय नियोजकाच्या सल्ल्याने कुटुंबाचे दीर्घकालीन आर्थिक नियोजन आखण्याला संमती.

Source : www.loksatta.com
arthmanas@expressindia.com
(सूचना : लेखातील कुटुंबाचे गुंतवणुकीचे नियोजन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे.)