आर्थिक सल्लागार कसा असावा?

आज आर्थिक नियोजनाचे महत्त्व आम जनतेला पटू लागले आहे आणि ‘सेबी’ आणि संलग्न संस्था तसेच म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदार जागरासाठी चालविलेला प्रचार बघता बरेच गुंतवणूकदार आज ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांत पर्यायात भांडवली बाजारात प्रवेश करू लागले आहेत. आर्थिक नियोजन करणाऱ्या सल्लागाराची गरज किती आहे याबद्दल विचार करण्याआधी सध्या आपल्या देशात गुंतवणूक करण्याची पद्धती कशी आहे हे प्रथम जाणून घेऊ या.

तेव्हा भारतात होणाऱ्या गुंतवणुकीपैकी अमेरिकी डॉलरमध्ये (७.५ ट्रिलियन डॉलर) ५६ टक्के हिस्सा अजूनही गुंतवणूकदार स्थावर मालमत्तेमध्ये करीत आहेत. त्या खालोखाल १६ टक्के रक्कम मुदत ठेवींमध्ये, ११.७ टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये, इन्शुरन्स फंडामध्ये ५.५ टक्के,  प्रॉव्हिडन्ट फंड आणि पेन्शन योजनांमध्ये ४.५ टक्के तर शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात ३.८ टक्के गुंतवणूक आहे. या पैकी स्थावर मालमत्ता, मुदत ठेवी आणि सोने या तिन्ही गुंतवणूक साधनांचा एकत्रित ८३ टक्के वाटाहोत असून, त्यातून परतावा मात्र ५.५ ते ६ टक्क्यांच्या वर मिळत नाही. तसेच हा परतावा करपात्रसुद्धा आहे त्यामुळे तो अजून कमी होतो आहे. यावरून असे लक्षात येईल की, ज्या गुंतवणूक साधनात विशेष परतावा मिळत नाही अशाच सर्व साधनांमध्ये गुंतवणूक अजूनही लोक करत आहेत. तरीही प्रसारमाध्यमे किंवा गुंतवणूक सल्लागार याबाबत बोलताना दिसत नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणुकीचे ३.८ टक्के प्रमाण हे अजूनही अत्यल्प असून ते वाढण्यासाठी आर्थिक साक्षरता वाढणे विशेष गरजेचे आहे. परंतु जे गुंतवणूकदार एकापेक्षा अधिक स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा ज्यांच्या विविध बँक शाखांमध्ये मुदत ठेवी आहेत आणि ज्यात त्यांना नगण्य परतावा मिळत आहे किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवली आहे जी सहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकत नाही. अशा साधनातून ही रक्कम म्युच्युअल फंडात वळविली जाणे आवश्यक आहे. परंतु ही आर्थिक समज एक तर फार कमी लोकांकडे आहे आणि तसे सुचवू शकणारे सल्लागारही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही नाहीत. जे काही सल्लागार आज आहेत, त्यांच्याकडे जाऊन विकतची सेवा घ्यावी असे तर खूपच थोडक्या लोकांना वाटते.

खरे म्हणजे ज्या ८३ टक्के गुंतवणूक साधनांतून विशेष परतावा मिळत नाही तिथून ती गुंतवणूक शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात आणली तर गुंतवणूकदारांचे आणि वितरकांचेही भले होईल. या उलट आज कथित आर्थिक साक्षरता कार्यक्रमांचा भर हा जीवन विम्यामधील रक्कम कमी करून अथवा जीवन विमा पॉलिसी बंद करून ती रक्कम म्युच्युअल फंडात वळवा असा सल्ला दिला जातो आहे. म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्री असा हा प्रकार आहे. प्रत्यक्षात जेव्हा शेअर बाजार उच्च पातळीवर असतो तेव्हा नफा पदरात पाडून घेण्याची वेळ असते, तर जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा बाजारात शिरायची वेळ असते. परंतु सध्या म्युच्युअल फंडात १५ ते २० टक्के परतावा मिळेल अशी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांना बाजारात आणले जात आहे.

हे चित्र बदलण्यासाठी सुज्ञ आर्थिक नियोजनकारांची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ‘एनआयएसएम’द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. सेबीला १) वितरक- जे म्युच्युअल फंडाच्या योजना विकतील २) सल्लागार जे गुंतवणूकदारांना कुठे गुंतवणूक करावी याचे मार्गदर्शन करतील असे अपेक्षित आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार जी मंडळी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करतात त्यांनी फक्त असे मार्गदर्शन करून त्याचे शुल्क आकारणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात हे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आपला सल्ला देण्याव्यतिरिक्त म्युच्युअल फंडांच्या विविध योजनासुद्धा विकत आहेत. याचे कारण बऱ्याचदा सल्ला घेणाऱ्या गुंतवणूकदारांची मानसिकता शुल्क द्यायची नसून जमेल तेवढे काम मोफत कसे करून घेता येईल याकडे असते. सध्या १० लाख वा त्यापेक्षा संख्येने अधिक असणाऱ्या जीवन विमा सल्लागारांच्या तुलनेत म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करून देणाऱ्या सल्लागारांची संख्या ८५,०००च्या आसपास आहे. या व्यतिरिक्त सीएफपी (सर्टिफाइड फायनान्शिअल प्लानर) डिग्री घेतलेली असलेल्यांना गुंतवणूकदारांचे आर्थिक नियोजन करता येते. परंतु यांचीही संख्या २५००च्या वर नाही. या स्थितीत गुंतवणूकदारांना विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू नका आणि ते पैसे म्युच्युअल फंडात गुंतवा असा सल्ला देणे धाडसाचेच ठरते. तसेच म्युच्युअल फंडाचे सल्लागार नेहमीच विमा सल्लागारांना अधिक कमिशन मिळते असा अपप्रचार करीत असतात. परंतु २० वर्षांची तुलना केली तर विमा पॉलिसी विक्रेता आणि म्युच्युअल फंडाचा विक्रेता या दोघांनाही कमिशनपोटी समान उत्पन्न मिळाल्याचे आढळून आले आहे (या तुलनेचा तपशील उपलब्ध असून, माहितीसाठी कुणाला हवा असल्यास प्रस्तुत लेखकाला ई-मेल करून मागविता येईल.). अशा परिस्थितीत आपला आर्थिक सल्लागार कसा असावा याची काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. (चौकट पाहावी)

निकषांची ही यादी कितीही लांबवता येईल परंतु केवळ विमा सल्लागार किंवा म्युच्युअल फंडाचा सल्लागार, बँक व्यवस्थापक, सनदी लेखाकार अशा व्यक्तींवर अवलंबून न राहता आपली गुंतवणूक क्षमता ओळखून विविधांगी पद्धतीची गुंतवणूक कशी करता येईल, असे मार्गदर्शन करणारा सल्लागार मिळणे गरजेचे आहे.

आणि जोपर्यंत असा समुपदेशक मिळत नाही तोपर्यंत जसे आपण काही दुखणे झाल्यावर त्या दुखण्यावरील तज्ज्ञाकडे जातो तसेच आपल्यास कुठल्या प्रकारची गुंतवणूक करायची आहे त्याचा विचार करून त्यातील तज्ज्ञ व्यक्तीस भेटावयास हवे.

 

आर्थिक सल्लागार कसा असावा?

१. आर्थिक सल्लागार हा परिचयाचा तसेच तुमचे जीवनमान कसे आहे ते समजून घेऊन सल्ला देणारा असावा.

२. तुमची आर्थिक उद्दिष्टे समजावून घेऊन त्यावर तुमच्या बचतीमधून कशा प्रकारे गुंतवणूक करावी असा सल्ला दिला जायला हवा.

३. ही व्यक्ती अनुभवी व पूर्णवेळ आर्थिक सल्लागाराचे काम करीत असेल तर अधिक चांगले.

४. गुंतवणूकदाराचे जोखीम व्यवस्थापन हा मुद्दा त्याच्या प्राधान्यक्रमावर असावा.

५. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती आर्थिक सल्लागाराला असणे गरजेचे आहे.

६. आर्थिक सल्लागार काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीविषयक मार्गदर्शन करणारा असावा.

 

अजित प्रभाकर मंजुरे AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.