आर्थिक व्यवहारांचे हुशारीने नियोजन करणे

एकदा वसंत ऋतुमधे सगळीच फुले सुवासाने दरवळत होती. नाकतोडे, भुंगे व इतर सर्व किटक आनंदाने बागडत होते. अशा आनंदमयी वातावरणात मुंग्या मात्र एका ओळीने काहीतरी शोधण्यासाठी निघाल्या होत्या. एक नाकतोडा त्या मुंग्यांना विचारु लागला, “इतके चांगले वातावरण आहे त्याचा आनंद घ्यायचा सोडून तुम्ही कशाच्या शोधार्थ निघाल्या आहात? त्यावर त्यापैकी एक मुंगी म्हणाली, “आम्ही हिवाळ्यासाठी अन्न गोळा करत आहोत”. “पण आता तर खूप अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तुम्ही नंतरही हे अन्न जमा करु शकता.” नाकतोडा म्हणाला. त्यावर ती मुंगी उत्तरली, “नाही, येता हिवाळा खूप मोठा व जास्त गारठा आणणारा आहे. म्हणूनच आम्ही आत्तापासूनच त्याची तयारी करून ठेवत आहोत”.

“तुम्ही किती मूर्ख आहात. किती छान सूर्यप्रकाश पसरलेला आहे. तुम्ही आनंद घ्यायचा सोडून विनाकारण चिंताग्रस्त होत आहात. ” मुंगी म्हणाली,”आत्ता सूर्यप्रकाश आहे पण लवकरच तो दुर जाणार आहे. म्हणूनच आमच्या बरोबर चल आणि थोडेफार अन्न जमा करून ठेव.” नाकतोडा त्यावर नकारार्थाने म्हणाला, “छे, तुम्ही सर्वे आनंदाचा नाश करणारे आहात.” असे म्हणत तो उड्या मारत निघून गेला.

हळुहळू हिवाळा सुरु झाला. जस जसा वेळ जात होता तस तसे नाकतोड्याला अन्न मिळणे कमी होऊ लागले आणि लवकरच अन्न मिळेनासे व्हायला लागले. नाकतोड्याला खूपच भूक लागली होती व तो थंडीने पूर्णतः गारठला होता. तो त्याच मुंगीला भेटला तेव्हा त्याने तिला विचारले,”खूपच थंडी वाढली आहे. तुला खूप भूक लागली असणारच. ” त्यावर मुंगी म्हणाली, “अजिबात नाही. तूला आठवते का तू आनंदाने नाचत बागडत होतास तेव्हा आम्ही सगळे अन्न गोळा करत होतो. आता आमच्याकडे पूर्ण हिवाळ्यात अन्नाचा तुटवडा भासणार नाही.” नाकतोड्याला स्वतःच्या बेजबाबदार वर्तणूकीवर लाज वाटू लागली. तसेच त्याला आपणही त्या हुशार मुंग्यांप्रमाणे थोडेफार अन्न गोळा करुन ठेवण्याची आवश्यक्ता आहे याची त्याला जाणिव झाली.

आपणही त्या मुंग्याप्रमाणे आपले खर्च व बचत याविषयी योजना आखणे गरजेचे आहे. त्या नाकतोड्याप्रमाणे योजनांशिवाय जगणे म्हणजे आपल्या भविष्यात येणा-या समस्याविषयी निष्काळजीपणा बाळगणेच आहे. त्यासाठी आपले आर्थिक व्यवहाराच्या रचनात्मक व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे.