आर्थिक नियोजन का महत्वाचे आहे – भाग १

वर्तमान पत्र वाचत असताना एक जाहिरात समोर आली “Shop online now and pay later”. हि जाहिरात मी माझ्या सोबत असलेल्या एका मित्राला दाखवली. त्याने लगेच अंदाज बांधायला सुरुवात केली…

“मोबाईल घेऊ कि बॅग घेऊ?

कोणती वस्तू घेतली तर चांगला डिस्काऊंट मिळेल?

ऑनलाईन मिळणारे सगळे प्रोडक्ट्स त्याने पाहायला सुरुवात केली. असे एक ना अनेक गोष्टी बघून त्याने ६ ते ७ वस्तू घेण्यासाठी निवडल्या आणि त्या कशा घेता येतील यावर त्याने मला प्रश्न केला ?

हे सारं पाहत असताना मला एक प्रश्न पडला कि सध्या एवढे पैसे नसताना हा गरज नसलेल्या गोष्टी घेण्यासाठी किती उत्सुक झाला आहे. उद्या जाऊन जर त्याच्याकडे पैसे आलेच नाहीत तर या सर्व वस्तूंचे पैसे तो फेडणार कसे ? पैसा हातात नसताना पैशाचे विभाजन त्याने आधीच ठरवून ठेवले होते.

असंच काहीस आपल्या सर्वांसोबत होतं… बरोबर ना!

आपण भविष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टींसोबत अचानक येणाऱ्या संकटांचा विचार करतच नाही.

उदाहण बघूया…

सध्या मला चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि पगारही चांगला मिळतो. माझ्या कामावर आणि आत्तापर्यंतच्या कामाच्या परिणामांवर सगळेच आनंदी आहेत त्यामुळे मला १००% खात्री आहे कि उद्या जाऊन नोकरी बाबत काहीच अडचण येणार नाही. असं असताना अचानक मला नोकरीवरून काढून टाकण्याची बातमी मिळाली. कंपनी मधून काही सहकाऱ्यांना कमी करण्याचे आदेश आले आणि त्यामध्ये माझं नाव होतं. मित्रांनो मी या गोष्टीचा कधीच विचार केला नाही.

मी गेली तीन वर्षे घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडत होतो पण आता मी पुढील हप्ते फेडू शकत नाही कारण आता माझ्याकडे माझी नोकरी नाही आणि लगेच मला अशी नोकरी मिळत अशक्य आहे.

नोकरी असताना मी काही गुंतवणुकी केल्या होत्या ज्यामध्ये युलिप्स आणि इन्शुरन्स मधील काही पॉलिसी होत्या पण काही कालावधीसाठी लॉक असल्याने त्यांना मोडून पैसा वापरू शकत नाही आणि त्या गुंतवणुकी मोडल्या तरी त्या पैशामध्ये घट होऊन मला गरज असलेली रक्कम उभी होऊ शकत नाही. या व्यतिरिक्त मी कोणतीच गुंतवणूक केली नाही हे माझं दुर्दैवच.

आता त्याच इन्शुरन्सचा हप्ता भरण्याची तारीख जवळ आले, घराचे लाईट बील, पाण्याचे बील, घराच्या कर्जाचा हप्ता या साऱ्यांचे पैसे योग्य वेळीस फेडण्यास मला खूप अवघड जातंय आणि या परिस्थितीची भीतीसुद्धा वाटत आहे.

या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी बँकेमध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज दिला पण तो सुद्धा बँकेने नकारला. कारण माझ्या क्रेडिट कार्डचे हप्ते गेली काही महिने भरलेच नाही त्यामुळे मी कर्ज घेण्यास योग्य व्यक्ती नाही असे बँकेने सांगितले.

हे सगळं घडत असताना मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटते कारण माझं कुटुंब हे माझ्या पगारावर चालत होतं पण आता त्यांच्या मूलभूत गरजा आणि आरोग्याची काळजी घेता येईल एवढेसुद्धा पैसे माझ्याकडे नाहीत. अचानक कोणाला दवाखान्यात किंवा मोठ्या हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागलं तर माझ्यावर मोठं आर्थिक संकट येईल याची मला खूप भीती वाटायला लागले.

मित्रांनो… या उदाहरणातून तुम्हाला कळेल कि आपण अचानक येणाऱ्या संकटांना आर्थिक दृष्ट्या तयार राहणं का गरजेचं आहे. यासाठी योग्य वयात योग्य गुंतवणुकीची सुरुवात करणं, अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणीची तरतूद करून ठेवणे, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडथळ्यांवर कसे मात करता येईल यावर योग्य सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. कारण आजची स्मार्टपणे केलेली गुंतवणूकच आपले उद्याचे भवितव्य ठरवणार आहे.

आपला मित्र
समीर पडवळ