अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन – Don’t put all your eggs in one basket

साधारणपणे सन १६००-१७००च्या काळापासून वापरात असलेले Don’t put all your eggs in one हे बोधवाक्य आहे. गुंतवणुकीच्या संदर्भात म्हणायचं झालं तर सगळे पैसे एकाच प्रकारच्या गुंतवणुकीत नसावेत. या मागचं कारण असं की, प्रत्येक गुंतवणुकीचे हंगाम असतात, बहर येण्याच्या वेळा वेगळ्या असतात आणि जोखीमसुद्धा वेगळी असते. म्हणून आपण जेव्हा आपला पोर्टफोलिओ बनवतो तेव्हा सदाबहार गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी शेअर आणि म्युचुअल फंड, स्थावर मालमत्ता, कर्ज रोखे, मुदत ठेवी, सोने इत्यादी पर्यायांची सांगड घालतो. तसे पाहायला गेले तर एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक उद्दिष्ट आधी ठरवून, स्वत:ची जोखीम क्षमता तपासून मग त्याला अनुसरून गुंतवणूक पर्याय आणि त्याचं समीकरण म्हणजेच, अ‍ॅलोकेशन जुळवून त्यानुसार गुंतवणूक करायची असते. परंतु बऱ्याचदा असं लक्षात येतं की, सर्वसामान्य गुंतवणूकदार या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. हातात पैसे आहेत आणि मागील परतावा चांगला आहे किंवा जोखीम घ्यायची नाही म्हणून आपल्याला आवडेल असा गुंतवणूक पर्याय निवडतो. सर्रास लक्ष परताव्यांकडे असल्यामुळे जोखीम बाजूला ठेवली जाते. जोवर फायदा होतोय तोवर कुणी बघतसुद्धा नाही, पण नुकसान दिसायला लागलं की मग धावपळ सुरू होते. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदाराने जर स्वत:चं असेट अ‍ॅलोकेशन धोरण ठरवलं, तर त्याला गुंतवणूक सांभाळणं सोयीस्कर होईल व गुंतवणुकीचे परतावे आणि गुंतवणूकदाराचे परतावे – यामधील तफावत कमी करता येईल. आज आपल्याकडे निरनिराळे म्युच्युअल फंड आहेत. त्यांची सांगड घालून आपण कशा प्रकारे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करू शकतो याचा आढावा घेणार आहोत :

  • कॉफी कॅन : यामध्ये आपण एक नियमित रक्कम ठरवलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवत राहतो. उदाहरणार्थ, एखाद्या जास्त जोखीम क्षमता असणाऱ्या गुंतवणूकदारासाठी २५ टक्के स्मॉल कॅप, २५ टक्के मिड कॅप, १० टक्के कन्झम्प्शन, १० टक्के बँकिंग आणि ३० टक्के व्हॅल्यू फंड हे समीकरण असू शकेल. प्रत्येक वर्षी हे समीकरण वापरून अ‍ॅग्रेसिव्ह पोर्टफोलिओ तयार करू शकतो. या प्रकारे केलेली गुंतवणूक शक्यतो १० र्वष व अधिक काळासाठी असल्याने फायदे होऊ शकतात. या गुंतवणूक धोरणामध्ये तेजी-मंदीनुसार समीकरण बदलता येत नाही. किंवा अधे-मध्ये फायदासुद्धा बाहेर काढता येत नाही. परंतु एखाद्या निष्क्रिय गुंतवणूकदारासाठी निवृत्ती योजना बनवायला अशा प्रकारचे धोरण कामी येऊ शकते. मात्र तुमच्या नजीकच्या काळासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद करताना इतर पर्याय वापरावे लागतील.
  • निश्चित टक्केवारी वाटप : यामध्ये आपण समभाग आणि रोखे यांची टक्केवारी निश्चित करून त्यानुसार गुंतवणूक करतो. शिवाय प्रत्येक वर्षी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही टक्केवारी कायम ठेवण्यासाठी जास्त झालेली बाजू विकून, कमी झालेल्या बाजूमध्ये गुंतवणूक केली जाते. याचा एक फायदा होतो, तो म्हणजे प्रत्येक टप्प्यावर नफा काढला जातो आणि जी बाजू स्वस्त झाली आहे तिथे गुंतवणूक होते. परंतु असे करताना कधी कधी फायदा जास्त लवकर काढला जाऊ शकतो. अशा प्रकारचे उदाहरण म्हणजे ५० टक्के दीर्घकालीन डेट फंड आणि ५० टक्के मल्टीकॅप म्युच्युअल फंड असे धोरण ठेवून बनवलेला पोर्टफोलिओ.
  • शंभर वजा वय म्हणजे समभाग गुंतवणुकीचे प्रमाण : हे एक ढोबळ समीकरण सगळीकडे प्रचलित झाले आहे. यामध्ये आपण असे मानतो की, गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता वयानुसार कमी होते. म्हणून त्याने प्रत्येक वर्षी नवीन गुंतवणूक करताना समभागातील गुंतवणूक एका-एका टक्क्याने कमी करत आणावी. उदाहरण म्हणजे एखादा २५ वर्षांचा गुंतवणूकदार ७५ टक्के पैसा इक्विटी फंडात आणि २५ टक्के दीर्घकालीन डेट फंडांमध्ये गुंतवू शकतो. हेच समीकरण पुढल्या वर्षी ७४ टक्के आणि २६ टक्के असे करावे लागेल. या धोरणामध्ये गुंतवणूकदाराच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचा विचार केला जात नाही. फक्त वयानुसार निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. परंतु सुरुवातीला अशा प्रकारे समभागसंलग्न गुंतवणूक करायला मदत होऊ शकते.
  • शेअर बाजारातील स्थितीनुसार धोरण : हे धोरण जरी योग्य वाटले तरी आचरणात आणायला फार कठीण आहे. यामध्ये वाढणाऱ्या शेअर बाजारात समभाग गुंतवणूक आणि पडणाऱ्या बाजारात रोख्यातील गुंतवणूक करावी लागते. यासाठी खूप अभ्यास आणि वेळ असावा लागतो. शिवाय बाजारात जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा नक्की काय करायचे हे कळणे कठीण होते. मग अशा वेळी डायनामिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन किंवा बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज म्युच्युअल फंड आपल्या मदतीला येऊ शकतात. या फंडामध्ये शेअर बाजार महाग झाला की समभागाचा हिस्सा कमी केला जातो आणि स्वस्त झाला की वाढवला जातो. या फंडांमध्ये समभाग हिस्सा किमान ६५ टक्के राखण्यासाठी डेरिव्हेटिव्हज्चा वापर करण्यात येतो. मुदत ठेवी व डेट फंडांपेक्षा यांचे परतावे जास्त असतात आणि जोखीम इतर इक्विटी फंडांपेक्षा कमी असते. परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बॅलन्स्ड म्युच्युअल फंड जास्त फायद्याचे ठरतात जे निश्चित टक्केवारी वाटप हे धोरण राबवतात.
  • ‘थिम’नुसार गुंतवणूक : या गुंतवणूक धोरणासाठी सगळ्या सेक्टर्सची माहिती असणे महत्त्वाचे आहे. कोणता सेक्टर कधी खाली असतो, कधी वर येतो आणि त्यातून कसा फायदा मिळवून गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचे कौशल्य ज्याला जमते त्यानेच हे धोरण पाळावे. या प्रकारच्या धोरणामध्ये सेक्टर फंडांचा वापर करून पोर्टफोलिओ बनवला जातो आणि सेक्टरच्या कामगिरीनुसार गुंतवणूक कालावधी ठरतो. उदाहरण म्हणून आपण एसबीआय म्युच्युअल फंडाच्या काही फंडांची मागील १० वर्षांची कामगिरी पाहू. (तक्ता पाहावा) तक्ता हे दर्शवतो की, प्रत्येक प्रकारच्या फंडाच्या चांगल्या कामगिरीचे दिवस वेगवेगळे असतात. हे चक्र समजून होणाऱ्या जो गुंतवणुकीची कामगिरी निश्चितच चांगली असेल.

कोणते धोरण जास्त फायद्याचे आहे हे प्रत्येक गुंतवणूकदाराने ठरवले पाहिजे. कारण प्रत्येक धोरणात वेगळे कौशल्य लागते आणि मुळात म्हणजे गुंतवणूक सांभाळायला वेगळा वेळ द्यावा लागतो. तेव्हा जे काही ठरवलं ते सातत्याने पाळलं तर यश मिळू शकेल. नाहीतर एक ना धड आणि भाराभर चिंता असे नको व्हायला.

– तृप्ती राणे

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

trupti_vrane@yahoo.com

Source : Loksatta Arthvruttant