आवडेल – परवडेल

आपल्या जीवनोपयोगी धडे आपल्याला कोठे आणि कसे मिळतील याचं एक उत्तम उदाहरण माझ्या समोर घडलं.

माझी बायको ज्योती, मेव्हणा नितेश आणि मी. तिघेही वाशी रेल्वे स्टेशन जवळ एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेलो होतो. टेबल वर येऊन आम्ही आसनस्थ झालो. एक वेटर दादाने आम्हाला पाणी दिले आणि ऑर्डर विचारली. पटापट एकमेकांना विचारून कोणाला काय हवंय याची यादी बनवली आणि ऑर्डर दिली. आता कोणालाही न आवडणाऱ्या गोष्टीला सुरुवात झाली ती म्हणजे वेटिंग.

नितेश आणि ज्योती फोटो काढण्यात मग्न होते आणि मी इकडे तिकडे पाहण्यात व्यस्त. तेवढ्यात उजव्या बाजूच्या टेबल वर एक वयस्कर जोडी येऊन बसली. दोघांचही वय साधारणतः ६० असावं असा माझा अंदाज. दोघांच्या बोलण्यात, हसण्यात एक वेगळाच आनंद होता. तेवढ्यात वेटरने त्यांना पाणी दिले आणि ऑर्डर विचारली. मेनू कार्ड पाहून दोघांनी एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी ऑर्डर केल्या. त्यांच्या चर्चा पाहून दोन मिनिटांसाठी वाटले एक मी आणि माझी बायकोसुद्धा यांच्या वयात आलो की असेच हसत-खेळत आयुष्य जगू.

असा मनात विचार येताच आमच्या डाव्या बाजूच्या टेबल वर एक व्यक्ती येऊन बसले. त्यांचे वय सुद्धा ६० असावं. अत्यंत साधे कपडे आणि सामान्य व्यक्तिमत्व वाटले. वेटर ने चालता चालता त्यांच्या टेबल वर पाण्याचा ग्लास ठेवला आणि पुढे निघून गेला. त्या व्यक्तीने मेनुकार्ड हातात घेतला आणि काय घेऊ शकतो हे पाहायला लागले. मी निरखून पाहिलं तर त्यांचा हात मेनुवर नसून त्यांच्या किंमतीवर होता. प्रत्येक गोष्टीची किंमत बघून त्यांना परवडणार नाही असे त्यांचे हाव भाव दिसून आले. वेटरला आवाज देत त्यांनी एक चहा आणि पाव ऑर्डर केली. वेटरने लांबूनच होकार दिला आणि लगेच चहापाव त्यांच्या टेबलावर आणून दिला. त्या व्यक्तीने चहा पाव खाऊन झाल्यावर शर्टाच्या खिशात हात घातला आणि १५ रुपयांची चिल्लर एकवटून वेटरला दिले.

मी सारं काही पाहत होतो. एकाच वयोगटात असलेल्या दोघांच्या आर्थिक घडामोडीत खूप वेगळेपणा होता. एका बाजूला “कोणती गोष्ट आवडेल” त्याचा विचार होता तर दुसऱ्या बाजूला “कोणती गोष्ट परवडेल” असा विचार होता… आणि त्या दोन्ही घटना मला माझं भविष्य कसं असावं याच उत्तर सांगत होतं.

खरच सांगायचं झालं तर आपल्या कमावत्या वयात योग्य बचत आणि योग्य गुंतवणूक का गरजेची असते त्याचं हे विदारक दृश्य पाहत होतो.


समीर दत्ताराम पडवळ
अर्थवेध वेल्थ मॅनेजमेंट

संपर्क : ८६५५८५००५६
ईमेल : sameer@arthvedh.in
वेबसाईट : www.arthvedh.in