नामनिर्देशन, इच्छापत्र आणि वारसा हक्क

ऑफिसला जायची गडबड आणि तेवढय़ात आईची कुरकुर..‘‘सुशील, जरा त्या बँकेमध्ये जाऊन ये. तुझ्या बाबांच्या खात्यात नामनिर्देशन नाहीय म्हणून अनेकदा पत्रं येत आहेत. तुझे बाबा तिकडे गावाला जाऊन बसले आणि माझ्या मागे मात्र हे उपद्व्याप लावून ठेवले. एक तर मला यातलं काही कळत नाही, म्हणून जरा तूच जाऊन ये. आणि एक अजून! त्या दिवशी सरंजामे येऊन गेले. अरे ते बाबांचे वकील मित्र. तुझे बाबा म्हणे गावी जायच्या आधी त्यांना इच्छापत्र करायचंय असं सांगून गेले. त्यासंदर्भात त्यांना आपल्या सर्वाशी काही बोलायचं आहे. मला धक्काच बसल्यासारखा झालं! हे नको ते उद्योग कशाला करतायेत कळत नाही. अरे, जे आहे ते तुमचंच तर आहे. मग या भानगडी कशाला?’’

आईची चिडचिड तशी नेहमीची, म्हणून एवढंच सांगून बाहेर पडलो – ‘‘आई! सरंजामे काकांना आज संध्याकाळीच बोलावून घे. आपण त्यांच्याकडून नीट समजावून घेऊ या.’’

संध्याकाळी ठरलेल्या वेळी सरंजामे काका आले. बाबांचे खूप जुने मित्र आणि खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाचे हितचिंतक. मागे आजोबा वारल्यानंतर त्यांच्याच सल्ल्यामुळे आम्हाला आमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा मिळू शकला आणि आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यामुळे काका जे सांगणार ते योग्यच!

चहा नाश्ता झाल्यावर काका म्हणाले – ‘‘अरे सुशील, बरं झालं की तू आज वेळ काढलास. तुझे बाबा रोज गावाहून फोन करून मला त्यांच्या इच्छापत्राची आठवण करून देतात. पण मीच त्यांना थांबवून ठेवत होतो की जोवर वहिनी आणि मुलांबरोबर बोलत नाही तोवर इच्छापत्र करूया नको.’’

तेवढय़ात आई म्हणाली – ‘‘अहो भाऊ! या सगळ्या गोष्टी कशाला? माझी चारही मुलं आज सुखात आहेत. सुदैवाने आम्हा दोघांना आमच्या पश्चात आमच्या मुलांचं कसं होणार हा प्रश्न नाहीये. मग कशाला हा इच्छापत्राचा खटाटोप! आणि शिवाय आमच्या सगळ्या आर्थिक गुंतवणुकींमध्ये आणि स्थावर मालमत्तांमध्ये आम्ही नामनिर्देशन करून घेतोय, तर तेवढं पुरे झालं की?’’

सरंजामे काका सगळं संयमाने ऐकून घेत होते. आई शांत झाली याची खात्री करून त्यांनी सांगायला सुरुवात केली:-

  • नामनिर्देशन (नॉमिनेशन) – आपल्या सर्व गुंतवणुकींमध्ये नामनिर्देशन करणे जरूरी आहे. नामनिर्देशित व्यक्ती (नॉमिनी) हा आपल्या मालमत्तेचा किंवा गुंतवणुकीचा फक्त विश्वस्त असतो. आपल्या पश्चात आपल्या गुंतवणुका व मालमत्तासंदर्भात ज्या व्यक्तीची जबाबदारी असते ती ही व्यक्ती. नॉमिनी हा मालक नसतो. मालमत्तेवर हक्क इच्छापत्रानुसार किंवा वारसा हक्क कायद्यानुसारच ठरतो.
  • इच्छापत्र (विल) – आपल्या इच्छेप्रमाणे आपली संपत्ती कुणाला, किती, कशी आणि कधी मिळाली पाहिजे या संबंधीच्या दस्तऐवजाला इच्छापत्र म्हटले जाते. येथे महत्त्वाची गोष्ट अशी की, आपण वडिलोपार्जित संपत्ती इच्छापत्राद्वारे विभाजित करू शकत नाही. वडिलोपार्जित संपत्तीसाठी वारसा हक्क कायद्यातील तरतुदी समजून घ्याव्या लागतील. इच्छापत्राची नोंदणी करणे बंधनकारक जरी नसले तरी जर भविष्यात काही कायदेशीर कार्यवाही करायची गरज पडली तर नोंदणी असणे उपयोगी पडते. योग्य पद्धतीने केलेल्या इच्छापत्रामुळे आपल्या संपत्तीची योग्य विभागणी करण्यात मदत होते.
  • वारसा हक्क कायदा – जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पश्चात जर इच्छापत्र नसेल तर त्याच्या संपत्तीसंदर्भात कौटुंबिक वाद सुरू होऊ शकतात. मग अशा वेळी वारसा हक्क कायद्यानुसार संपत्तीचे विभाजन केले जाते. आपल्या देशात वेगवेगळे वारसा हक्क कायदे आहेत. शिवाय पुरुषाच्या संपत्तीचे वारसदार आणि स्त्रीच्या संपत्तीचे वारसदार हे वेगळे आहेत. म्हणून आपल्याला जो कायदा लागू होतो तो योग्य व्यक्तीकडून समजून घ्यावा.

एवढे सांगून काका थांबले आणि म्हणाले-  ‘‘अहो वहिनी! आज देवाच्या कृपेने तुमची सगळी मुलं सुखात आहेत, एकमेकांशी चांगले संबंध ठेवून आहेत. परंतु पुढचं कुणाला माहीत आहे का? तुम्हा दोघांनी जेवढे कष्ट करून आज संपत्ती तयार केली आहे, तिचा आनंदाने उपभोग यापुढेही तुमच्या मुलांना आणि नातवंडांना मिळावा असं तुम्हाला वाटतंय ना? म्हणून माझ्या मित्राचा इच्छापत्रासाठी हट्ट चालला आहे.

शिवाय वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तुमच्या मुलांचा आणि नातवंडांचा हक्क आहे. या गोष्टीची जाणीव त्यांनासुद्धा करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या बाबतीत सहकार्य करावं असं माझं ठाम मत आणि माझ्या आपुलकीच्या कुटुंबासाठी सल्ला आहे. पुढे निर्णय तुमचा!’’

काकांच्या सांगण्यावर आईला सगळं पटलं. तिने आनंदाने होकार दिल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. आता पुढच्या कामाला लागतो असे सांगून काका निघून गेले आणि पुन्हा एकदा त्यांचा भक्कम आधार आमच्या कुटुंबाला असल्याबद्दल मनोमन आभार मानले!

 

लेखक : तृप्ती राणे

साभार : लोकसत्ता अर्थवृतांत