आयुष्य जगा.. राजाप्रमाणे!

अलीकडेच मी एक-दोन एमबीए कॉलेजांमध्ये प्री-प्लेसमेंट निवड-चर्चेसाठी गेले होते. नोकरीस इच्छुक काही तरुणांबरोबर मी काही आयएपी सत्रेही घेतली. बऱ्याच उत्साही मिलेनिअल्सना (यात १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते २००० सालापर्यंत जन्मलेले मोडतात) मी भेटले, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या विचारांमध्ये डोकावण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या आयुष्याचा मंत्र म्हणजे ‘वर्तमानात जगा आणि तेही राजेशाही थाटाने जगा.’

काही प्रवाह नव्याने उदय पावत आहेत. मिलेनिअल्सची पसंती स्वत:च्या मालकीचे असे काही निर्माण करण्यापेक्षा शेअरिंगला अधिक आहे. स्वत:ची चारचाकी गाडी चालवण्यापेक्षा त्यांना ओला किंवा उबर चांगली वाटते. त्यांना तंत्रज्ञानाचे वेड आहे. रांगेत उभे राहण्यापेक्षा मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून किराणा मालाची खरेदी किंवा सिनेमाची तिकिटे ते काढतात. बँकिंगच्या पद्धतीही बदलल्या आहेत. हे लोक अधिक वर्तमानात जगत आहेत आणि आरोग्याबद्दल दक्ष आहेत. फिटबिट्ससारखी गॅझेट्स त्यांच्यात खूप लोकप्रिय आहेत. हा वर्ग सामाजिकदृष्टय़ा सक्रिय आणि चांगली जाण असणारा आहे. खरेदीचे निर्णय करताना हा वर्ग सेलिब्रिटींचे अनुकरण करत नाही, तर स्वत: संशोधन करून उत्पादन विकत घेतो आणि त्या आधी ऑनलाइन परीक्षणही करतो.

या सर्वात वेगळे काही असेल तर तो त्यांच्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन. त्यांना त्यांचे आई-वडील जसे जगले तसे जगायचे नाही. खूप कष्ट करून भविष्यकाळासाठी पुंजी साठवायची आणि त्यासाठी वर्तमानकाळात खूप त्याग करून स्वत:चे आयुष्य जगायचेच, हे त्यांना नको आहे. ही तरुण पिढी निर्भय आहे. करिअरच्या निवडीपासून ते वेगळे छंद जोपासण्यापर्यंत सगळीकडे ते आव्हाने घेण्यास तयार आहेत.

आम्ही जेव्हा गुंतवणुकीबद्दल बोललो तेव्हा जुन्या पद्धतीने जगून भविष्यासाठी साठवून ठेवण्याबद्दल ते फारसे उत्सुक नव्हते. त्याऐवजी त्यांना बिटकॉइन विकत घेण्यात रस होता. हा विचार थोडा अस्वस्थ करणारा वाटला. कारण, भोगवाद आणि क्रेडिटची हाव याबाबत आपण पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करत आहोत की काय असे वाटत होते. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या नियोजनाऐवजी झटपट पैसा मिळवून देण्याच्या कल्पनेने हा वर्ग रोमांचित झाल्यासारखा वाटला. त्यांना गुंतवणुकीतील जोखमीची जाणीव कितपत आहे, अशी शंका मला आली.

लवकर निवृत्ती घेऊन स्टार्ट-अप सुरू करण्याची भाषाही अनेक जण बोलत आहेत. उद्योजक होणे चांगलेच आहे. मात्र, लवकर निवृत्तीसाठी आर्थिक सुरक्षितता अधिक लागते याची त्यांना जाणीव आहे की नाही, अशी मला शंका आहे. मिलेनिअल्सपैकी मोठय़ा वयोगटातील लोक आता तिशीच्या मध्यात आहेत. निवृत्तीचे ६० हे पारंपरिक वय विचारात घेता, त्यांच्याकडे अद्याप २५ वर्षे आहेत. या वयोगटातील लोकांना विभक्त कुटुंबपद्धतीची जाणीव चांगलीच आहे आणि आपल्या अखेरच्या वर्षांसाठी आपल्यालाच तरतूद करायची आहे याचीही जाणीव आहे. निवृत्तीसाठी बचत करण्याची वेळ येते तेव्हा लवकरात लवकर याची सुरुवात करणे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो, जेणेकरून निवृत्तीच्या वेळेपर्यंत एक पुरेसा निधी उभा राहिलेला असेल. नुकतीच करिअरची सुरुवात केली असेल तर सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी सुरू करून मासिक बचतीची सवय लावून घ्यावी असा माझा सल्ला राहील.

गुंतवणुकीच्या आवश्यकतेबाबत मिलेनिअल्सना शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठीची कारणे पूर्वीच्या तुलनेत अधिक ठोस झाली आहेत. भविष्यकाळात आपल्या राहणीमानात खूप बदल होणार आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक कामे अनावश्यक होणार आहेत. प्रत्येक उद्योगात चाकोरीबाहय़ असे बदल सुरू आहेत आणि काही प्रकारची कामे पूर्णपणे नाहीशी होणार आहेत. या कारणामुळे भविष्यकाळासाठी बचत करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वर्तमानकाळात जगणे उत्तम आहे पण यासाठी भविष्यकाळ असुरक्षित होण्याची किंमत मोजावी लागायला नको. या वर्गाने त्यांच्या वेतनाचा काही भाग बाजूला काढून पैसे उभे केलेच पाहिजेत.

शेवटी मी बचतीची सवय लागण्यासाठी एक साधा पण प्रभावी असा नियम सांगते. तुमचे वय जेवढे असेल, तेवढा टक्के रक्कम मासिक उत्पन्नातून बाजूला काढा. उदाहरणार्थ, तुम्ही २५ वर्षांचे असाल, तर तुमच्या उत्पन्नाचा किमान २५ टक्के वाटा दर महिन्याला बचतीसाठी बाजूला पडला पाहिजे. यामुळे मिलेनिअल्सना त्यांच्या मौजमजेच्या इच्छांबाबतही तडजोड करावी लागणार नाही आणि बचतीची सवयही अंगी बाणवता येईल.

‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे एक वाक्य आहे – ‘तुम्ही किती पैसा कमावता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही किती पैसा राखता, तो तुम्हाला किती मिळवून देतो आणि किती पिढय़ा तो राखला जातो हे महत्त्वाचे आहे.’ तेव्हा केवळ पैसा कमावण्यावर लक्ष केंद्रित करू नका, तर शहाणपणाने गुंतवणूक सुरू करा आणि चांगली संपत्ती निर्माण करा हा मिलेनिअल्ससाठी मंत्र असला पाहिजे.

श्यामली बसू
(लेखिका एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आणि उत्पादन व विपणन प्रमुख आहेत.)

Source : लोकसत्ता टीम | June 25, 2018