म्युच्युअल फंडांचे प्रकार आणि गुंतवणूक वैविध्य

तुम्ही कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार असलात तरी तुमचे आर्थिक उद्दिष्ट म्युच्युअल फंड नक्कीच पूर्ण करू शकते.

लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडाचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र हे समजून घेणे महत्त्वाचे की, प्रत्येक म्युच्युअल फंडाचे जोखमीचे आणि परताव्याचे स्वरूप वेगवेगळे असते. सर्वसाधारणपणे, जितका संभाव्य परतावा अधिक असतो तितकी संभाव्य नुकसान होण्याची जोखीम अधिक असते. प्रत्येक म्युच्युअल फंडाचे पूर्वनियोजित गुंतवणूक उद्दिष्ट असते ज्याद्वारे फंडाची मालमत्ता, गुंतवणुकीचे क्षेत्र आणि गुंतवणुकीची पद्धती निश्चित केली जाते.

 

वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड खालीलप्रमाणे आहेत:

इक्विटी फंड / वृद्धीसक्षम फंड :

कंपन्यांच्या भांडवली समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांना इक्विटी फंड म्हणतात. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट मध्यम ते दीर्घ गुंतवणूक कालावधीत गुंतवणुकीच्या भांडवलात वाढ करणे हे असते. इक्विटी फंड हे उच्च जोखीम असलेले फंड असतात आणि त्यांचा परतावा शेअर बाजाराशी निगडित असतो. ते दीर्घ मुदतीत वृद्धीची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अगदी योग्य असतात. इक्विटी फंडाचे वेगवेगळे प्रकार असतात जसे डायव्हर्सिफाइड फंड, सेक्टर स्पेसिफिक फंड आणि इंडेक्स फंड वगैरे

  • डायव्हर्सिफाइड फंड : हे फंड तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये आणि मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशनचा म्हणजेच शेअर बाजारातील वैविध्यतेचा फायदा करून देतात. साधारणपणे कोणत्याही ठरावीक क्षेत्राशी निगडित न राहता बाजारपेठेत गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा योग्य पर्याय आहे. डायव्हर्सिफाइड फंड हे शुद्ध इक्विटी फंडाच्या तुलनेत कमी जोखमीचे असतात.
  • सेक्टर फंड : हे फंड मुख्यत्वे एखाद्या ठरावीक क्षेत्रातील किंवा उद्योगातील कंपन्यांच्या इक्विटी समभागांमध्ये गुंतवणूक करतात. हे फंड उच्च परतावा देत असले तरी डायव्हर्सिफाइड फंडांच्या तुलनेत त्यात अधिक जोखीम असते. गुंतवणूकदारांना त्या क्षेत्रांच्या /उद्योगांच्या कामगिरीवर आणि आपल्या गुंतवणुकीवर जवळून लक्ष ठेवावे लागते.
  • टॅक्स सेव्हिंग फंड : हे फंड आयकर कायदा, १९६१ अंतर्गत गुंतवणूकदारांना करलाभ देतात. या योजनेत मिळणाऱ्या संधी या आयकर कायदा, १९६१ मधील कलम ८० सीअंतर्गत करातील सवलतीच्या स्वरूपात असतात. करात सूट मिळवू पाहणाऱ्या आणि दीर्घ मुदतीत वृद्धीची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ते अगदी योग्य आहेत.

 

डेट फंड/स्थिर मिळकत फंड

हे फंड्स मुख्यत्वे कॉर्पोरेट बाँड्स, डिबेंचर्स, सरकारी कर्जरोखे, कमर्शिअल पेपर्स आणि इतर मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्टससारख्या स्थिर मिळकत रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. मध्यम ते दीर्घ मुदतीत ज्यांना कमी जोखीम आणि नियमित व स्थिर मिळकत हवी असते अशा गुंतवणूकदारांसाठी हा योग्य पर्याय आहे. ते इक्विटी फंडांच्या तुलनेत अत्यल्प जोखीम घेतात.

  • लिक्विड फंड / मनी मार्केट फंड : हे फंड अतिशय तरल अर्थात लिक्विड मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करतात आणि रोकडसुलभता देतात. या फंडांचा गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमी एक दिवसाचा असू शकतो. अगदी अल्प मुदतीसाठी आपल्या पैशाची गुंतवणूक करणाऱ्या कॉर्पोरेटस, गुंतवणूकदार संस्था आणि व्यापार घराण्यांसाठी अतिशय योग्य.
  • गिल्ट फंड : हे फंड केंद्र आणि राज्य सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि ज्यांना कमी जोखीम घेण्याची क्षमता आहे अशा मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. सरकारी रोख्यांमध्ये मूलभूत जोखीम नसते.
  • बॅलन्स्ड फंड : हे फंड इक्विटी/समभाग आणि डेट (स्थिर मिळकत) अशा दोन्हींमध्ये गुंतवणूक करतात आणि वृद्धी आणि नियमित मिळकत दोन्ही देण्याचा प्रयत्न करतात. हे माफक जोखीम घेण्याची इच्छा असलेल्या मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी ते योग्य असतात.
  • इंडेक्स फंड : हे फंड भांडवली बाजाराचा लोकप्रिय निर्देशांक, जसे सीएनएक्स निफ्टी इंडेक्स आणि एस अ‍ॅण्ड पी बीएसई सेन्सेक्स यांच्याप्रमाणेच गुंतवणूक करतात. इंडेक्स फंडाचे मूल्य संलग्न संदर्भ निर्देशांकाच्या प्रमाणानुसार बदलते. अशा योजनांचा एनएव्ही निर्देशांकांनुरूप वाढतो आणि कमी होतो. ‘ट्रॅकिंग एरर’ नावाच्या घटकामुळे निर्देशांकाच्या तुलनेत यात थोडासा फरक असतो; गुंतवणूकदार माफक प्रमाणात जोखीम सहन करू शकतो.
  • एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) : एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) शक्य होईल तितके जास्तीत जास्त निर्देशांक, कमोडिटी बास्केट यांचा मागोवा ठेवतात. त्यांना कमोडिटीच्या प्रत्यक्ष धारणेचा आधार असतो आणि ते कंपन्यांचे समभाग, मौल्यवान धातू आणि चलन यांत गुंतवणूक करतात. ईटीएफ संपूर्ण दिवसभर एक्सचेंजवर युनिटची खरेदी आणि विक्री करण्याची लवचीकता देतात. गुंतवणूकदार थोडी अधिक जोखीम स्वीकारण्यास तयार असल्यास आदर्श पर्याय ठरेल.

 

सोने गुंतवणुकीचा अस्सल लवचिक पर्याय

पारंपरिकरित्या होणारी सोने-खरेदी अथवा गोल्ड बाँड्समधील गुंतवणुकीपेक्षा, अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय तंत्रज्ञानाने प्रस्तुत केला असून, अवघ्या १ रुपयांत डिजिटल सोने खरेदी आणि साठवणुकीची सोय मुंबईस्थित वित्तीय तंत्रज्ञान कंपनी टीएमडब्ल्यूने ग्राहकांना करून दिली आहे. सर्वात लवचिक असा सोने गुंतवणुकीचा पर्याय ‘टीएमडब्ल्यू—गोल्ड’ नावाने तिने प्रस्तुत केला आहे. याचे वैशिष्टय़ असे की, २४ कॅरेट (९९९.९ टक्के शुद्धतेच्या) सोन्याची खरेदी अथवा विक्री निर्धोकपणे आणि फसवणुकीविना विश्वासाने करता येईल. शिवाय कोणतेही अतिरिक्त साठवण शुल्क न भरता पाच वर्षे कालावधीपर्यंत ग्राहकांचे हे सोने सुरक्षितपणे जतनही केले जाईल.

‘टीएमडब्ल्यू-गोल्ड’बद्दल ‘कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री म्हणाले, ‘जगातील सर्वाधिक सोन्याचे ग्राहक भारतात आहेत. आजही भारतात सोने हा गुंतवणुकीचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. भविष्यासाठी तरतूद म्हणून दीर्घ काळासाठी थोडीथोडकी नियमित बचत करू इच्छिणारी देशातील अनेकानेक कुटुंबांसाठी ही नवीन सुविधा सोयीचा पर्याय ठरेल.’’ टीएमडब्ल्यू-गोल्डच्या मदतीने ग्राहक जागतिक गुणवत्तेच्या सोन्याची खरेदी अथवा गरज प्रसंगी विक्री बाजारसंलग्न किमतीवर त्वरित आणि विनासायास करू शकतील, असा त्यांनी दावा केला.

गुंतवणूकदारांना नेमकी किती रक्कम कशा पद्धतीने जमा करावयची आहे हे ठरविण्याची मुभा असेल. गोल्ड ईटीएफप्रमाणे या गुंतवणुकीत कोणताही कुलुपबंद काळ (लॉक इन पिरियड) अथवा ठरावीक काळात गुंतवणूक करीत राहण्याचे बंधन नाही. प्रत्येक खरेदीगणिक ग्राहकांना सोने खरेदीचे प्रमाणपत्र बहाल केले जाईल. खरीदलेले सोने हे आभासी कोषात (व्हॉल्ट्स) साठविले जाईल आणि ग्राहकांना त्यांनी कमावलेले टीएमडब्ल्यू रिवार्डम्सही सोन्यात रूपांतरित करता येतील. भारतीय बाजारपेठेत दाखल झालेली टीएमडब्ल्यू गोल्ड ही सर्वात लवचिक आणि सोयीस्कर सोने गुंतवणूक योजना आहे, असा कलंत्री यांचा दावा आहे.

 

– भालचंद्र जोशी

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

साभार : लोकसत्ता