लवकर सेवानिवृत्ती कशी घेता येईल?

सेवानिवृत्ती ही साधारणपणे वयाच्या ६०-६५ व्या वर्षी घेतली जाते. हा निवृत्ती काळ म्हणजे एवढे वर्षांच्या अर्थाजर्नातून केलेल्या बचत आणि गुंतवणुकीची साथ, शिवाय इतर जबाबदाऱ्यांतून मोकळे झाल्यामुळे पैशाची निकड कमी असणारा असतो. एक प्रकारे हे आर्थिक स्वातंत्र्यच. पण हे आर्थिक स्वातंत्र्य वयाच्या ६०-६५ व्या वर्षी मिळविण्यापेक्षा ४०-४५ व्या वर्षीच मिळविता आले तर..

सेवानिवृत्ती घेतल्यानंतरचे अर्थ नियोजन कसे करावे याचा विचार बहुतेक लोक करतात; परंतु सेवानिवृत्ती लवकर कशी घेता येईल याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. हल्लीचे खासगी कंपन्यांमधील नोकरी करणे, हे बरेच जणांना तणावाचे वाटते. काहींना त्याच त्याच कामाचा कंटाळा येतो. मुंबईसारख्या शहरामध्ये तर प्रवासाचे हाल सोसून कार्यालयात जाऊन काम करणे कंटाळवाणे वाटू लागले आहे. त्यातून ते काम आवडीचे नसल्यास दुसरा पर्याय नाही म्हणून काम करावे लागत असेल तर अशा वेळी विचार येतो की, ‘कधी एकदाची रिटायरमेंट घेईन, असे झाले आहे..!!’

एवढी सगळी मेहनत आणि कष्ट करून आपण पैसा कमावतो, पण ते वापरून हवा तसा आनंद उपभोगायलासुद्धा आपल्याकडे वेळच नाही. कधी कुठे जायचे, म्हणजे हवी तशी सुट्टी घेता येत नाही. आवडीचे छंद जोपासता येत नाहीत. कारण वेळ मिळत नाही अथवा कामावरून आल्यावर आणखी काही करायची ताकदच उरत नाही. या सर्वाचे दूरगामी परिणाम आपल्या कौटुंबिक जीवनावर आणि स्वास्थ्यावर होत असतात.

सेवानिवृत्ती ते आर्थिक स्वातंत्र्य..

या सर्वातून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी सेवानिवृत्ती लवकर कशी घेता येईल याचा विचार करायला हवा किंवा वेगळ्या प्रकारे मांडायचे झाले तर आर्थिक स्वातंत्र्य लवकर कसे मिळवता येईल हे समजून घेतले पाहिजे. साधारणपणे सेवानिवृत्ती ही ६०-६५ व्या वर्षी घेतली जाते. ६०-६५ नंतर आपण पैशासाठी काम करण्याचा विचार कोणी करत नाही, म्हणजेच यानंतर फिरायला जाणे, वाचन इत्यादी गोष्टी केल्या जातात अथवा घरी आराम करणे हा पर्याय असतो. काही जण तब्येत साथ देत असेल तर इतर काही छोटा व्यवसाय सुरू करतात किंवा मन रमेल अशी कामे करतात. या ठिकाणी मिळकतीचा विचार केला जात नाही, कारण सेवानिवृत्ती वेतन किंवा एवढे वर्ष काम करून केलेली बचत आणि गुंतवणूक जवळ असते. तसेच इतर जबाबदाऱ्यांतून मोकळे झाल्यामुळे पैशाची निकड कमी असते. अशा प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आयुष्यातील ‘जर आणि तर’ यापासून मुक्तता मिळवणे.

काही जण, फक्त आपली हालचाल सुरू राहील, वेळही घालवता येईल आणि त्याकरवी काही उत्पन्नही मिळेल असा विचार करून काही लहान-मोठे काम स्वीकारतात. तेथे त्यांना आपल्याला आवडेल असे काम स्वीकारायची मानसिकता असते. आयुष्यातील हा बदल रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्याप्रमाणे – Change your focus from making money to serving more people. Serving more people makes the money come in, अशा प्रकारे घडवता येईल.

वर सांगितल्याप्रमाणे ६०-६५ व्या वर्षी मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य, आपण वयाच्या ४०-४५ व्या वर्षीच मिळवू शकतो. होय, हे शक्य आहे. जर त्या दृष्टीने तुमची मानसिक तयारी झाली असेल आणि वेळीच आर्थिक नियोजन केले गेले तर तुम्ही असे घडवून आणू शकता. यामध्ये भविष्यात येणारे खर्च, जसे की मुलांच्या शिक्षणासाठीचे खर्च, सेवानिवृत्तीनंतर होणारे कौटुंबिक खर्च इत्यादी गणितांची मांडणी केली जाते, ज्यात केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा आणि भविष्यात होणारी भाव वाढ धरून योग्य आराखडा आखून भविष्यातील खर्चाची मांडणी करून योग्य गुंतवणूक पर्यायांची निवड केली जाते. तसे करून ठेवल्यास ४०-४५ व्या वर्षांनंतर नुसते उत्पन्न मिळवण्याची चिंता न करता आपण आरामशीरपणे आपले आवडते काम हाती घेऊन त्यातून काही मिळकत घेऊ शकतो किंवा पूर्णपणे सेवानिवृत्तही होऊ शकतो.

आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

१) साहजिकच आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी मिळवण्यासाठी त्या दृष्टीने करावे लागणारे नियोजन लवकरात लवकर सुरू केले पाहिजे. यासाठी योग्य आर्थिक नियोजकाची निवड करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणुकीचे असेच पर्याय निवडले गेले पाहिजेत जे तुमच्या ध्येयांशी संलग्न असतील. त्यात विम्याचा विचार गुंतवणूक म्हणून न पाहता ‘रिस्क कव्हर’ म्हणून करणेही समाविष्ट आहे.

२) आर्थिक नियोजकाकडे जाण्यापूर्वी तुमची संपूर्ण मानसिक तयारी असायला हवी. तुम्हाला खरेच मनापासून लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असल्यास, परंतु तुमची मनाची तयारी नसल्यास आर्थिक नियोजकाला तुम्हाला मदत करणे कठीण जाते. या ठिकाणी अलिक आईस यांनी म्हटले आहे- The secret to Financial Security is not to have more money, but having more control over money we have. कारण या नियोजनामध्ये बऱ्याच गोष्टी या तुमच्या सहकार्याशिवाय करणे शक्य नाही.

३) तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांची मने यासाठी तयार असावी लागतात. समजा, यजमानांचा कल बचत करण्याकडे आहे, तर पत्नी तेवढा खर्च कमी करू शकत नसते किंवा काही कुटुंबांमध्ये हे उलटपक्षीही असते. पत्नीचा कल बचतीकडे असतो, यजमान तेव्हा खर्च कमी करू शकत नाहीत. जोडीदारांना परस्परांच्या साहाय्याची यात अतिशय आवश्यकता आहे.

४) वरील मुद्दा यासाठी जरुरीचा आहे, कारण आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याच्या नियोजनात जेवढी जास्त बचत अर्थार्जनाच्या काळात करू तेवढे लवकर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगता येते.

५) केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळत आहे, त्यापेक्षा जास्तीत जास्त बचत कशी होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. कारण बचत करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

६) अवाजवी किंवा वायफळ खर्च कमी करण्यावर भर दिला गेला पाहिजे. उदा. एक स्मार्टफोन १२,००० रुपयाला येतो, तर दुसऱ्या ब्रॅण्डचा ६५,००० रु. / १,००,००० रुपयांना मिळतो. दोन्ही स्मार्टफोनचा वापर तेवढाच, त्यांचे आयुष्यही तेवढेच. निवड तुमच्या हातात असते.

७) कर्ज किंवा देणी असतील तर ती फेडण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे व पुढे जाऊन कर्जाची आवश्यता भासणार नाही अशा प्रकारे भविष्यातील ध्येयांचे नियोजन केले पाहिजे. यात क्रेडिट कार्डावर खर्च करणे टाळणे हेही समाविष्ट आहे.

८) ६०-६५ व्या वर्षांच्या मानाने लवकर निवृत्त झाल्यावर आपण काय करू इच्छिता याचा विचार पहिल्यापासूनच करा. एखादा आवडता व्यवसाय अथवा एखादे आवडीचे काम करू इच्छित असाल तर त्या संदर्भात माहितीही आतापासूनच गोळा करू शकता. असे काम करण्याचा प्रथम उद्देश तुमची आवड जोपासणे असेल, न की उत्पन्न मिळवणे. त्यामुळे त्या कामात तुम्ही आनंदी असाल.

जर तुम्ही खरोखरीच असे करू शकलात तर लवकरच तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकालच, शिवाय जीवनातील समाधान आणि आनंदही उपभोगू शकाल. आपल्या कुटुंबासाठी भरपूर वेळ देऊ शकाल, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल, कौटुंबिक संबंध चांगले होतीलच, आयुष्यदेखील संतुष्ट असेल.

Financial Freedom is available to those who learn about it and work for it. 
– Robert Kiyosaki

जग खूप मोठे आहे. चाकोरीबाहेर दृष्टी नेऊन पाहिल्यास अनेक गोष्टी उपभोगण्याचे अनुभव खूप सुंदर आहेत. मग तेच ते किंवा नाइलाजाने काम करीत राहणे, आवडीनिवडी बाजूला ठेवून केवळ प्रपंच म्हणून जीवन व्यतीत करणे कशासाठी? नक्की विचार करा. आढावा घ्या स्वत:च्या जीवनाचा, तुमची काय आवड आहे..? जीवनाच्या अनिश्चित कालावधीत तुम्ही काय करू इच्छित आहात..? जेवढा लवकर विचार कराल, तेवढे लवकर ते मिळविण्यासाठी मन बनेल, त्यामुळे पुढे जाऊन त्या दृष्टीने योग्य वाटचाल सुरू करू शकाल.

आर्थिक वर्ष बदलले आहे. नव्या आर्थिक वर्षांत नवीन आर्थिक विचार आणि उद्दिष्टे ठेवा, नवीन सुरुवात करा.


किरण हाके
लेखक आर्थिक नियोजनातील ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल kiran@fingenie.in वर संपर्क साधता येईल.

साभार : लोकसत्ता टीम | April 16, 2018